Pneumonia ( निमोनिया )
निमोनिया
आपण पहिल्या लेखाबद्दल दिलेल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.. !!आज आपण बघणार आहोत असा आजार ज्याने सध्याच्या कोविड -19 च्या भयावह परिस्थितीत डोकं वर काढलं होतं आणि तो आजार म्हणजेच 'निमोनिया.'बऱ्याच लोकांना या आजाराबाबत ठाऊक असेल पण तरी आपण अगदी सोप्या सहज भाषेत या आजाराचा जवळून आढावा घेऊ..त्याचप्रमाणे निमोनिया आणि कोरोना वायरस ह्यांचा कसा एकमेकांशी संबंध येतो तेही पाहूया.. !!
श्वसनप्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 3 अवयवांचा उपयोग अतिशय महत्वाचा असतो. सगळ्यात प्रथम (1)श्वसननलिकेमार्फत म्हणजेच 'ट्रॅकिया' मार्फत बाहेरचा ऑक्सिजन आत घेतला जातो. श्वाननलिकेला पुढे दोन छोट्या नलिका जोडलेल्या असतात ज्या एकमेकांच्या विरुद्ध दीशेला असतात ज्यांना (2)' ब्रॉंचाय 'असं म्हणतात आणि हे ब्रॉंचाय फुफुसाला जोडलेले असतात. फुफुसांच्या आत आणि ब्रॉंचाय ला जोडून अगदी छोट्या छोट्या श्वसन नलिका असतात ज्यांना (3)'ब्रॉन्किओल्स' असं म्हणतात.
ब्रॉन्किओल्स ना जवळून पाहिलं तर त्यांच्या अगदी टोकाशी छोट्या गोलाकार आकृती मध्ये पिशव्या (sags)असतात. ज्यांना 'एलव्हिओलाय 'असं म्हणतात. ह्या एलव्हिओलाय च्या आतमध्ये श्वसनप्रक्रिया सुरु असते.
आत घेतला जातो आणि त्या बदल्यात आतला कार्बन डाय ऑक्साईड बाहेर श्वानलनिकेमार्फत नाकामधून बाहेर टाकला जातो. ह्या संपूर्ण प्रक्रियेमुळे फुफुसांमध्ये आकुंचन आणि प्रसरण हे होतं असते..
या ब्रॉन्किओल्स च्या आतील बाजूस 'सिलिया 'नावाच्या असंख्य पेशी असतात. आपण घरात केरकचरा काढण्यासाठी झाडू वापरतो जेणेकरून जमीन साफ राहावी..अगदी तसंच काम या 'सिलिया' करत असतात. बाहेरून येणारे बॅक्टेरिया, वायरस या सिलिया वर येऊन चिकटतात आणि सिलिया त्यांना पूर्णपणे चिटकण्यास विरोध करून पुढे ढकलतात.
अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, वायरस तसंच पॅरा साईट्स सिलिया ला येऊन चिटकतात.. सध्या चा कोरोना वायरस सुद्धा प्रथम सिलिया वर आघात करतो.
हे सर्व विषाणू सिलीया मधून एलव्हिओलाय मध्ये प्रवेश करतात. जर माणसाची रोगप्रतिकारक्षमता चांगली असेल (उदारणार्थ तरुण वय )तर या एव्हिओलाय मध्ये असलेल्या पेशी या विषाणूंना मारून टाकतात. आणि यामुळेच विषाणूंपासून आपल्या शरीराचं संरक्षण होतं.
ज्या माणसांची रोगप्रतिकारक्षमता कमी असते (उदारणार्थ वयस्कर माणसे ) त्यांच्यात विषाणूंना मारणाऱ्या पेशी या सक्षम नसतात. त्यामुळे विषाणूंची संख्या झपाट्याने पसरते आणि म्हणूनच एलव्हिओलाय मध्ये पाणी भरायला सुरवात होते.ह्या सर्व प्रकारामुळे एलव्हिओलाय आपले काम सुरळीत करू शकत नाहीत आणि म्हणून श्वसनविकाराचा त्रास जाणवू लागतो.
आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या कोरोना च्या परिस्थितीत का वयस्कर माणसांना घरी राहण्याचा सल्ला दिला जात होता तसंच का वयस्कर लोक कोरोना चे बळी पडत होते..
जेव्हा हा श्वसनविकाराचा त्रास सुरु होतो तेव्हा मात्र ऑक्सिजन पुरवणारी कृत्रिम मशीन म्हणजेच व्हेंटिलेटर लावणं गरजेचं होतं. कारण फुफुसांमध्ये भरणाऱ्या पाण्यामुळे श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतं असतात.
जेव्हा फुफुसांच्या एकाच भागावर परिणाम होतो तेव्हा त्याला 'लोबर निमोनिया' असं म्हणतात. आणि जेव्हा फुफुसाच्या वेगवेगळ्या भागांवर इजा होते तेव्हा त्याला 'ब्रॉंचो निमोनिया' असं म्हणतात.
काही वेळेला निमोनिया मध्ये रक्त आणि म्युकस यांच्या गाठी फुफुसांच्या आतील बाजूस निर्माण होतात ज्याला 'अबसेस' असं म्हणतात तर काही वेळेला अशा गाठी फुफुसांच्या बाहेरील बाजूस बनतात ज्याला 'एम्पीमा' असं म्हणतात. निमोनिया हा आजार फुफुसांपासून इतर अवयवांमध्ये पसरत जातो आणि ज्यामुळे प्रत्येक अवयवात पाणी भरत जाऊन अवयव काम करण्याचे बंद होतात आणि मृत्यू ओढवतो.
लक्षणं :-
छातीत दुखणे.
खोकला
ताप आणि मोठ्या प्रमाणात थंडी वाजणे
स्नायू दुखणे.
थकवा.
मित्रहो, आता पर्यंत आपल्याला समजलं असेलच कोरोना वायरस आणि निमोनिया ह्यांचा कसा संबंध आहे ते. खास करून वयस्कर लोकांनी आपल्या शरीराची जास्त काळजी घ्यायला हवी. वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळ्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही विनंती.
धन्यवाद !!
उन्मेश दत्तात्रय साळस्कर.